आता घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना मिळणार, गॅस कंपन्यांना आदेश

1 min read

नवी दिल्ली दि.२४:- अमेरिका- इस्रायल आणि ईराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी गैसचा टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे दावा करत आहेत कि देशात एलपीजी गॅसचा मुबलक साठा आहे, मात्र आता गॅस टंचाईची बाब लपून राहिलेली नाही. अजूनही गॅस सिलिंडरसाठी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. या दरम्यान सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात मोठा महत्वाचा बदल केला आहे. आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे.यापूर्वी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना मिळत होता. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. सध्या आपल्याकडे असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन गॅस सिलेंडर कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. याशिवाय,कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा आहेत.गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजी साठी गॅस पुरवठा बंद केला होता. त्यामुले हॉटेल इंडस्ट्रीवर गंडांतर ओढवले होते. मात्र, आता इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धजन्य परिस्थिती मुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढीव पुरवठा तत्काळ लागू करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!