अमेरिका-इराण युद्ध पाच दिवस थांबणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

1 min read

वाँशिंग्टन दि.२४:- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या 24 दिवसां पासून सुरू असलेल्या भीषण युद्धानंतर, ट्रम्प यांनी इराण वरील सर्व लष्करी हल्ले पुढील 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा केली जाणार असून पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील एक आठवडा ही चर्चा सुरू राहणार आहे. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.विशेष म्हणजे, या घोषणेच्या एक दिवस आधीच ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बाबत कडक इशारा दिला होता. त्यांनी सांगितले होते की, जर इराणने 48 तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील.मात्र आता चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्या मुळे अमेरिकेने हल्ले तात्पुरते थांबवले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू झाल्यामुळे युद्धविरामाची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय पुढील चर्चेनंतरच घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांच्या मते, जर चर्चा यशस्वी झाली तर मध्यपूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो, अन्यथा पुन्हा लष्करी कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!