“भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा”:- उद्धव ठाकरे
1 min read
मुंबई दि.२२:- अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.याच भोंदू बाबा अशोक खरात बरोबर राज्यातील आणखी काही नेत्यांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान,
अशोक खरात प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत ‘भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा’, अशी मोठी मागणी केली आहे. तसेच राज्यातील राजकारण आणखी किती किती खालच्या स्तरावर नेणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“महाराष्ट्र आणखी किती खालच्या स्तरावर नेणार आहात? महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्याचं पालन करणारेच जर अशा प्रकारे भोंदू बाबाच्या नादी लागत असतील तर भोंदू बाबाच्या भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे.
जे राजकारणात भोंदू बाबाचे भक्त दिसत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वांची चौकशी करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray : “भोंदू बाबासह भोंदू भक्तांवरही कारवाई करा”, अशोक खरात प्रकरणात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
“अशा प्रकारे जर गावोगावी भोंदू बाबा असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्या नेत्यावरही कारवाई झाली पाहिजे. राज्यातील राजकारण आपण आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहात?”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
“हा मुद्दा काही सत्ताधारी आमदारांच्या संबंधित आहे. आमच्या काही आमदारांनी सत्ताधाऱ्यांचे अनेक प्रकरणं बाहेर काढले आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणे देखील समोर आणले आहेत. मी आता मागच्या एक पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं
की मुख्यमंत्र्यांनी अजून एक पांघरुण खातं निर्माण केले पाहिजे. सगळ्यांच्या पापांवर पांघरुण घालणं, हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
