जर्सी नर वासरे माळरानावर सोडण्याचे प्रमाण वाढले
1 min read
बेल्हे दि.२२:- गाई व्याल्यानंतर नर जातीचे वासरू जन्माला आल्यास अनेक दूध उत्पादक शेतकरी ते बेवारसपणे माळरान, रस्त्यालगत, कालव्यांच्या परिसरात अथवा जंगली भागात सोडून देत असल्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी उपासमारीमुळे या निरागस वासरांचा तडफडून मृत्यू होत असून, या हृदयद्रावक घटनांमुळे सामाजिक संवेदनशीलतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्नर तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. दूध उत्पादनातून उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू असला तरी नर जातीच्या वासरांच्या संगोपनाचा खर्च परवडत नसल्याने त्यांना सोडून देण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
अशा वासरांचा काही दिवसांतच उपासमारीने मृत्यू होत असून,त्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. राजुरी, आळे, बोरी, बेल्हे, मंगरूळ, पारगाव, निमगाव सावा, आणे, उंचखडक आदी गावांच्या परिसरात ही समस्या तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाने नर जातीच्या वासरांच्या संगोपनासाठी ठोस धोरण आखावे, तसेच त्यांचा शास्त्रीय पद्धतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी यांनी केली आहे.
