“शाश्वत उत्पन्नासाठी ऊस लागवडीकडे वळा”:- तज्ञ संचालक विकास चव्हाण

1 min read

बेल्हे दि.२२:- “शाश्वत उत्पन्नाचे पिक म्हणून ऊस लागवडी कडे शेतकऱ्यांनी अधिकाधिक वळावे,” असे आवाहन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी केले.सुरू हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूर (ता. जुन्नर) येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ऊस शेतीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवण्या साठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीची खते, सेंद्रिय खतांचा वापर आणि पिकांची फेरपालट यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच योग्य वाणांची निवड, ‘सुपर केन’ तंत्रज्ञानाचा अवलंब, सरीतील योग्य अंतर राखणे, नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर, फुटव्यांची योग्य संख्या राखणे, संतुलित खत मात्रा आणि प्रभावी पाणी व्यवस्थापन या बाबींवर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वतःच्या ऊस शेतीतील अनुभव सांगत त्यांनी यशोगाथाही मांडली व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी मोरडे यांनी ऊस विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमास चिमाजी गाडगे, गणेश गाडगे, बाळासाहेब आतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे रुपेश डेरे यांनी केले तर आभार प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव मुळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!