“तुमच्यावर अटकेची टांगती तलवार, आधी जामिनाचं बघा, मग नोटिसा पाठवा”, अंधारेंचा चाकणकरांना खोचक सल्ला
1 min read
मुंबई दि.२२:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी २० मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अशोक खरात प्रकरणी त्यांचं नाव समोर आल्याने राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
आता याही पुढे जाऊन सुषमा अंधारे यांनी त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसंच, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी आता जामीनाचा प्रयत्न करावा, असा खोचक सल्लाही अंधारे यांनी दिला. त्यांनी याबाबत आज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
तुमच्यावर अटकेची टांगती तलवार
माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,’रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला.
त्यावर मला हसायला आलं. कारण, माणसं केविलवाणी धडपड करतात. पण त्याने काही फरक पडणार नाही. मला नोटीस वगैरे पाठवण्याचं राहूद्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.’
चाकणकरांनी पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला
दरम्यान, अशोक खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला माहिती नव्हतं. समाज माध्यमांवर प्रसारित झालेले फोटो हे काही वर्षांपूर्वीचे आहेत, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या,
‘अशोक खरातविषयीच्या सर्व गोष्टींना रुपाली चाकणकर अवगत होत्या. तुम्हाला एक वर्षांपासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. तुम्ही संघटित गुन्हा केला आहे. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तुमची अटक होणं गरजेचं आहे.’
सुनेत्रा वहिनींनी नेतृत्वातला खमकेपणा दाखवण्याची संधी दवडली
दरम्यान, रुपाली चाकणकरांविरोधात रोष निर्माण झाल्या नंतरही त्यांनी राजीनामा दिला नव्हता.पक्षाकडूनही त्यांच्या बाबत प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर, याप्रकरणात खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आदेश दिल्याने चाकणकरांनी राजीनामा दिला.
यामुळे सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांवरही टीका केली. त्या म्हणाल्या, ‘काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरंतर सुनेत्रा वहिंनींनी हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला पाहिजे नव्हती. सुनेत्रा वहिंनींना नेतृत्त्वातला खमकेपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली.’
अजित पवारांचा वारसा जपणारे?
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, ‘अजित दादा कधीही गंडेदरे करणारे नव्हते.त्यांनी भोंदुगिरीला थारा दिला नाही. असे गंडे दोरे, अंगारे धुपारे करणारी बाई राष्ट्रावादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे पक्षाची बदनामी होणार असेल तर तिला तातडीने महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. अन्यथा ते करणं होणार नसेल तर आम्ही अजित दादांचा वारसा जपणारे आहोत असं कृपया सांगू नका.’
‘चाकणकर बाई तुमचा जामीन झाल्यावर मला नोटिसा पाठवा.तुमच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तुमच्याकडे ५००-६०० कोटी रुपये आहेत. सुनील तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या चळवळीतल्या माणसाला धमकावण्याचा प्रयत्न नक्की कराल. पण अशा धमक्या गेल्या २५ वर्षांपासून आम्ही रोज बघत आहोत’, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
