वाढत्या तापमानापासून दिलासा, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस
1 min read
पुणे दि.१६:- गेल्या काही दिवसांत राज्यभरात वाढलेल्या तापमानाने हैराण झाल्यानंतर आता पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसामुळे वाढलेले तापमान, उष्णता, उन्हाचे चटके यापासून काही प्रमाणास दिलासा मिळू शकतो.
यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील काही ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक, तर विदर्भातील अकोला येथे ४० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. मार्चमध्येच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. तीव्र ऊन, घामाच्या धारा यांचा अनुभव उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येत आहे.
मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांमुळे आता पावसाची स्थितीही निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, १६ मार्च रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुण्यात पुढील चार ते पावस दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, उन्हाळ्यात पाऊस पडणे ही सर्वसामान्य स्थिती आहे.
तापमान वाढल्यामुळे बाष्प खेचले जाते. सध्या बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. तसेच स्थानिक जलसाठ्यां तूनही बाष्पीभवन होते.त्यामुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो.पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होते.पुढील तीन ते चार दिवस दुपारी-सायंकाळी विजा, ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पावसासह वारे वाहण्याची शक्यता असल्याने हवेतील धुलिकण वाढू शकतात. मात्र, पुढील तीन ते चार दिवस तापमानवाढीपासून काही प्रमाणासात दिलासा मिळू शकतो. दरम्यान, शनिवारी राज्यात सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सियस कमाल तापमान अकोला येथे नोंदवले गेले. पुणे येथे ३७.४, जळगाव येथे ३८, कोल्हापूर येथे ३७.१,
मालेगाव येथे ४०, नाशिक येथे ३६.१, सोलापूर येथे ४०, मुंबई येथे ३३.५, रत्नागिरी येथे ३२.३, डहाणू येथे ३४.८, धाराशिव येथे ३८.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.८, परभणी येथे ३८.८, अमरावती येथे ४०.८, बुलढाणा येथे ३८.२, ब्रह्मपुरी येथे ४०.३, चंद्रपूर येथे ३९.८, वर्धा येथे ४०.९, नागपूर येेथे ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
पावसाचे क्षेत्र मोठे
राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर छत्तीसगड, ओडिशा, बंगाल, पंजाब येथेही पावसाची शक्यता असल्याची माहिती अनुपम कश्यपी दिली दिली.
