बेल्ह्यात पहिलीच्या वर्गपूर्वतयारी वर्गाचे उद्घाटन
1 min read
बेल्हे दि. १५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे क्रमांक १ (ता.जुन्नर) येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी इयत्ता पहिलीच्या वर्गपूर्वतयारी वर्गाचे उद्घाटन डॉ. मनोहर खोमणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले,
शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी जुन्नर तालुक्यातील पूर्व विभागातील सर्वाधिक पटसंख्येची शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यामध्ये चालू शैक्षणिक वर्षात शाळेत आयडियल टीचर लॅब, एआय लॅब, वार्षिक स्नेहसंमेलन, मंथन ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा तयारी, क्रीडा स्पर्धांची तयारी, डिजिटल स्क्रीनद्वारे अध्यापन तसेच संगणक शिक्षण असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे पालकांचा या शाळेकडे ओढा वाढत आहे.
वर्गपूर्वतयारी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावून आनंददायी शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या वर्गासाठी आवश्यक साहित्य आदर्श शाळा योजनेअंतर्गत उपलब्ध झाले आहे. यावेळी उपशिक्षक हरिदास घोडे, अशोक बांगर व संतोष डुकरे यांनी पालकांचे प्रबोधन केले.
शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य ईश्वर पिंगट यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील भौतिक सुविधांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षापासून शाळेमध्ये स्पोकन इंग्रजीचे स्वतंत्र क्लास सुरू करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ यांनी दिली.
तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून सर्वांनी जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमास प्रशांत औटी, गोरक्ष शिरतर, शेखर पिंगट, स्वाती कोकणे, प्रज्ञा शर्मा, सुवर्णा कदम,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मिरा बेलकर,
रोहिदास साळवे, प्रविणा नाईकवाडी, नूरजहाँ पटेल, सुषमा गाडेकर व अंजना चौरे यांनी केले. वर्ग पूर्वतयारी वर्गाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बालकांना शालेय व्यवस्थापन सभेचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ यांस कडून खाऊ वाटप करण्यात आले.
