बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी कारची एकमेकांना धडक; तीन जणांचा मृत्यू
1 min read
सोलापूर दि.१६:- धाराशिव-लातूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या विचित्र अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.प्राथमिक माहिती नुसार, बोलेरो गाडी अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोलेरो समोरील वॅगनार कारला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडी पलटी झाली
आणि दुभाजक ओलांडून पलीकडील लेनमध्ये गेली. याच दरम्यान समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारवर ही गाडी जोरात आदळली.या तिहेरी धडकेत तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.
अपघातातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत. महामार्गावर रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळत असून, वाहनांच्या तुटलेल्या भागांमुळे अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते.
