कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; करवीर तालुक्यात गारपीट

1 min read

कोल्हापूर दि.१५:- कोल्हापूरातील करवीर तालुक्यात आज अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. फक्त पाऊस नाही तर काही ठिकाणी गारपीटदेखील झाली आहे. काही ठिकाणी पाऊस इतक्या जोरात पडला की घरांच्या काचा फुटल्या आहेत.अचानक झालेल्या या गारपिटीमुळे अनेक ठिकाणी घरांच्या काचा फुटल्याच्या घटना घडल्या. काही भागात वाऱ्याचा वेगही मोठा होता आणि विजांचा कडकडाटही झाला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढले होते आणि उन्हाचा तडाखा तीव्र झाला होता. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र पावसाचा वेग आणि गारपिटीमुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली.दरम्यान हवामान विभागाने सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठीही पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या भागातही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतेक भागात कोरडे आणि उष्ण वातावरण जाणवत आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता अधिक असून काही ठिकाणी उष्णतेची लाटही जाणवत आहे. अशा परिस्थितीत पुढील चार दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!