पुणे- नाशिक महामार्गावर एसटी- ट्रक – टेम्पो अपघात; पाच जखमी

1 min read

मंचर दि. ८:- एसटी बस, मालट्रक आणि टेम्पो या तीन गाड्यांच्या अपघातात एसटीमधील पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत कात्रज डेअरीसमोर शुक्रवारी (दि.७) सायंकाळी झाला. जखमीवर मंचर येथे उपचार केले जात आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर एसटी आगाराची बस (एमएच १४ केक्यू ३६२६) ही पुण्याकडून नाशिककडे चालली होती. त्याचवेळी नाशिककडून मालट्रक (एमएच १२ पीव्ही २१०३) आणि टेम्पो (एमएच १२ एएल ४८२४) ही दोन्ही वाहने पुण्याकडे चालली होती. पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाट्याच्या पुढे एसटी व दोन्ही वाहनांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटीतील सचिन बाबासाहेब फापाळे (वय १९, रा. गारगुंडी पारनेर), शुभम संजय नाईक (वय २०, रा. संगमनेर), विनायक देवदत्त भारमळ (वय १८, रा. नारायणगाव), सायली बेल्हेकर (वय ३५, रा. निघोटवाडी, मंचर) आणि एका जखमीचे नाव समजले नाही. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एसटी चालकाच्या बाजूच्या मागच्या चाकाचे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मंचर येथील उद्योजक अरविंद वळसे पाटील यांनी सहकार्य केले. एसटी चालक एस. बी. आंधळे यांच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले असल्याची माहिती पोलीस जवान संजय नाडेकर यांनी दिली.

अपघाताची माहिती समजताच मंचर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा.सुरेखा निघोट यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णांना परस्पर खाजगी रुग्णालयात दाखल करणारे खाजगी रुग्णवाहिका चालकांविरुद्ध मंचर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक होडगर, ग्रामीण रुग्णालय दक्षता सदस्य डी.के.वळसे यांच्याशी संपर्क करून अवाजवी बिल भरल्याशिवाय पेशंट ला सोडत नसल्याने खाजगी रुग्णालयात जाऊन एस.टी.अधिकारींशी चर्चेतुन शुभम संजय नाईक यांचं साडेपाच हजार बिल न घेता रुग्णास सोडण्यात आले. त्यांना संगमनेर येथे उपचारासाठी एस.टी.फाॅर्म पुन्हा रात्री १० वाजता मिळवुन दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे