टँकर पलटी होऊन पेटला; दोघांचा होरपळून मृत्यू

1 min read

पाथर्डी दि.६:- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरने पलटी होऊन पेट घेतला. या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत टँकर पूर्णतः आगीच्या विळख्यात सापडला. टँकरमधील चारजण जखमी झाले आहेत. जखमींवर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. गणेश रामराव पालवे (वय ४२, रा. पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय ४६, रा. माळी बाभूळगाव, ता.पाथर्डी) असे दोन जण आगीत जळून मृत झाले आहेत. लहू सांडू पवार (वय ५३), सुमन लहू पवार (वय ४९), जगदीश जगन पवार (वय ३), कोमल जगन पवार (वय ७, रा. विसरवाडी, ता. पैठण), टँकरचा मुख्य चालक दादासाहेब केकाण ( रा.पालवेवाडी) असे जखमींची नावे आहेत. गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर उलटल्याने तो टँकर खाली सापडला. त्यामुळे तो आगीमध्ये जळून खाक झाला.इथेनॉल घेऊन जाणारा हा टँकर माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर उलटूला. त्यानंतर त्याला आग लागली. हे दृष्य पाहून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. अग्निशामक दलालाही बोलावण्यात आली. टँकरमधील पाच जणांना बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. मात्र, सहचालक गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोघे टँकरमध्ये अडकल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. गणेश पालवे टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला. त्याचा चेहरा वगळता शरीर आगीमध्ये जळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे