पुणे – नाशिक महामार्गावर डॉक्टरचे कार वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक; एक जागीच ठार; दुसरा गंभीर

1 min read

आळेफाटा दि.१८:- पुणे – नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे जाणाऱ्या दुचाकीला पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिली.सोमवारी (दि. १७) सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल निमसे व सुरेश जेडगुले हे रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान दुचाकीने (बीएलए ६८८८) निघाले होते. त्याच दरम्यान नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारे डॉ. गणेश अरुण वाकचौरे यांनी त्यांच्या ताब्यातील कार (एमएच १४ एफएस २३७७) ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. कारचा स्पीड एवढा होता, दुचाकीवर मागे बसलेला एकजण हवेत उडून रस्त्यावर आपटला. तर दुसऱ्याला दुचाकीसहीत काही अंतरावर कारने फरपटत नेल्याची माहिती मिळाली आहे.या अपघातात अनिल मारुती निमसे (वय ५२, रा. निमसेमळा आळे, ता. जुन्नर) हे गंभीर जखमी झाले असून सुरेश भाऊ जेडगुले (वय ५८, रा. रामवाडी आळे, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. सुरेश यांचा भाऊ रमेश भाऊ जेडगुले (वय ५५, रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक डॉ. गणेश अरुण वाकचौरे (रा. आळे, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताचा तपास पोलिस नाईक संजय शिंगाडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे