रक्ताने माखलेल्या उबेर कारचे गूढ अखेर उकलले; इंजिनीअरिंगचा विद्यार्थी अटकेत, हत्येचे धक्कादायक कारण उघड!
1 min read
कल्याण दि.१०:- काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथील गोवेली रोडवर एका रक्ताने माखलेल्या उबेर कारमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बेपत्ता असलेल्या चालकाचा मृतदेह ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला.
आता या गुन्ह्याचा धक्कादायक खुलासा झाला असून, प्रवाशाला लुटण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत उबेर चालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास टिटवाळा पोलिस आणि ठाणे एलसीबी करत होते. ठाणे एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि त्यांच्या विशेष पथकाने वेगाने तपासाला सुरुवात केली.
उबेर कंपनीच्या मदतीने कारचा रोडमॅप आणि शेवटचा प्रवासी कोण होता, याचा तांत्रिक शोध घेण्यात आला. तेव्हा समोर आले की, इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आदर्श भालेराव या तरुणाने आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याला जाण्याकरिता ही उबेर कार बुक केली होती.
प्रवास सुरू झाल्यानंतर जेव्हा त्यांची गाडी गणेश खिंडीजवळ पोहोचली, तेव्हा चालक नासीर अन्सारी याने गाडी अचानक थांबवली. नासीरने आदर्शला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली आणि “तुझ्याकडचे पैसे बऱ्या बोलाने दे,” अशी थेट धमकी दिली.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे आदर्शने स्वसंरक्षणार्थ प्रतिकार करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा चालकाला मारण्याचा कोणताही पूर्वहेतू नव्हता. के
वळ दमदाटी आणि पैशांच्या वादातून हा प्रसंग उद्भवला. मात्र, नियतीने असा काही डाव आखला की, या संघर्षात एक चालक जीवानिशी गेला आणि दुसऱ्या बाजूला एका तरुण विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले.
