घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी वाढला
1 min read
नवीदिल्ली दि.१०:- मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे.ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे
की सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता.
आता तो आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजे जर तुम्ही 1 तारखेला शेवटचा बुक केला असेल तर आता तुम्हाला 25 तारखेआघी सिलिंडर बुक करता येणार नाही.
