शेतकऱ्याने घेतले चक्क पंचवीस एकर फळबागेवर शेडनेटचे पांघरून

1 min read

बेल्हे दि.३:- मार्च महिना सुरू झाला असून दोन दिवसांपासून अचानक कडक उन्हाळ्याच्या झळा जुन्नर तालुक्यातील चालू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दूध उत्पादक आणि फळ बागायतदार वर्ग चिंताग्रस्त झाला असून आपापल्या परीने द्राक्ष, आंबे आणि डाळिंब बागायतदार आपल्या बागेचे आणि फळ झाडांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. साकोरी (ता.जुन्नर)येथील डाळिंब बागायतदार पांडुरंग साळवे आणि त्यांची मुले शहाजी साळवे, अक्षय साळवे यांनी आपल्या डाळिंब बागेचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चक्क पंचवीस एकर फळबागेवर शेडनेटचे पांघरून घातले आहे.तीव्र उन्हाच्या झळा झाडांना लागून झाडे मुरझायला लागली असून फुले व फळांची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग साळवे यांनी सांगितले.आधीच मागील काही महिने ढगाळ वातावरणामुळे फुल गळती मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागली. पंचवीस एकरला एक फवारणी करायची असेल तर कमीत कमी नव्वद हजार रुपये खर्च येत असल्याचे शहाजी साळवे यांनी सांगितले.मागील काही महिने खराब वातावरणामुळे खत औषधे करून फुलगळती थोड्याफार प्रमाणात कमी झाली असता आता लगेच कडक उन्हाळा चालू झाला त्यामुळे आता उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेटचा अनाठायी खर्च करावा लागत आहे.पंचवीस एकर क्षेत्रासाठी दहा लाख रुपये किमतीचे शेडनेट वापरले असल्याचे अक्षय साळवे यांनी सांगितले.फळबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत असून बाजारभाव मात्र कवडीमोल मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येत आहे अशी खंत देखील पांडुरंग साळवे यांनी बोलून दाखवली.साळवे पिता पुत्रांची फळ बागेवर शेडनेटचे आच्छादन करण्याची यशस्वी कल्पना बऱ्याचशा शेतकऱ्यांना पटली असून आता आजूबाजूचे शेतकरी पण आपल्या बागेवर आच्छादन करत असल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!