चेन्नईतील समुद्रात महाराष्ट्रातील मुलं गेली वाहून
1 min read
चेन्नई दि.२२:- तामिळनाडूतील चेन्नईमधील समुद्र किनारी झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्रातील तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कॉग्नीझंट कंपनीत इंटर्नशिप करणारे काही तरुण-तरुणी शनिवारी सुट्टीनिमित्त बीचवर फिरायला गेले होते.
त्यावेळी ग्रुप सेल्फी घेताना मोठ्या लाटा उसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भंडारा येथील रहिवासी असलेली मयुरी चौधरी हिचा बुडून मृत्यू झाला, तर जळगाव येथील जय पाटील नावाचा तरुण बेपत्ता आहे. एकाला वाचवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉग्नीझंट या आयटी कंपनीच्या चेन्नई शाखेत महाराष्ट्रातील काही मुलं इंटर्नशिप करत आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने एकूण २६ तरुण-तरुणी चेन्नई येथील पुद्दुचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीचवर फिरायला गेले होते. यावेळी समुद्र काही प्रमाणात खवळला होता.
अशा स्थितीत काही तरुण समुद्राच्या कडेला उभं राहून सेल्फी काढत होते. याच वेळी १० ते १५ फूट उंचीच्या लाटा उसळल्या आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.
स्थानिक सरकारला सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि आपल्या मुलांचे मृतदेह महाराष्ट्रात परत आणण्यात येण्यास सहकार्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत तसेच पीडित कुटुंबियांच्या देखील संपर्कात राहून मदत करत आहेत.
