पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; 19 जणांचा मृत्यू

1 min read

इस्लामाबाद दि.२२:- गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेल्या पाकिस्तानने अखेर अफगाणिस्तान च्या सीमेत घुसून मोठी लष्करी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानमधील सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले असून यामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि ‘इस्लामिक स्टेट-खोरासान’च्या ठिकाणांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे या कारवाईची पुष्टी केली आहे.पाकिस्तान सरकारने या कारवाईला ‘जवाबी कारवाई’ म्हटलं आहे. अलीकडच्या काळात इस्लामाबादमधील इमाम बारगाह, बाजौर आणि बन्नू येथे मोठे आत्मघाती हल्ले झाले होते. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट होती. पाकिस्तानचा दावा आहे की, या हल्ल्यांचे सूत्रधार अफगाणिस्तानमध्ये बसले असून त्यांच्याकडे याचे भक्कम पुरावे आहेत. ही कारवाई केवळ गुप्त माहितीच्या आधारे निवडक तळांवर केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात एकूण १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासन आक्रमक झाले आहे. “आम्ही या हल्ल्याला नक्कीच चोख प्रत्युत्तर देऊ, त्याची वेळ आणि पद्धत आम्ही स्वतः ठरवू,” असा इशारा तालिबानने दिला आहे. दुसरीकडे, बलूच कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी या हल्ल्यावरून कडाडून टीका केली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने हवाई हद्दीचे उल्लंघन करून पक्तिका प्रांतातील एका धार्मिक मदरशाला लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात कुरानच्या प्रतींचे नुकसान झाले असून, अशा दमनकारी कृत्यांमुळे या भागात अस्थिरता आणि द्वेष अधिक वाढेल, असं त्यांनी म्हटलं आहे.या एअर स्ट्राईकच्या काही काळ आधी खैबर पख्तूनख्वा मधील बन्नू येथे लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला. तसेच १६ फेब्रुवारी रोजी बाजौर येथे झालेल्या हल्ल्यात ११ सैनिकांचा बळी गेला होता. पाकिस्तानचा आरोप आहे की, २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून अफगाण भूमीचा वापर पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी केला जात आहे. दोहा कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत पाकिस्तानने अनेकदा इशारे दिले होते.या ताज्या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!