राज्यात पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
1 min read
पुणे दि.२२:- महाराष्ट्रातून गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू कमी होत आहे. थंडीचा प्रभाव ओसरला असून कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. परस्परविरोधी वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल होत असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
संक्रातीनंतर महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला.आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच वातावरणात सतत चढउतार बघायला मिळेल. विजांच्या कडाकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
