बोरी येथे कोयत्याचा धाक दाखवून १५ तोळे सोने लंपास
1 min read
बोरी दि.२२:- बोरी बुद्रुक या ठिकाणी कोरडे मळ्यात राजेंद्र कोरडे यांच्या घरी कोयत्याचा धाक दाखवत १५ तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची जबरी चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील कोरडे मळ्यात रहात असलेले राजेंद्र सिताराम कोरडे हे आपल्या कुटुंबातील पत्नी हिरा मुलगा नितीन, सुन धनश्री व मुलगी दिपाली या सदस्यां समवेत शेतात असलेल्या घरात राहतात. शनिवार दि.२१ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावर मोठा दगड टाकुन दरवाजा तोडला.
झालेल्या आवाजाने घरातील सर्व जण जागे झाले. समोरच्या दरवाज्यातून दोघेजण व मागच्या दरवाजातून दोघेजण आत आले. समोर चोर दिसल्याने आरडाओरडा करायला सुरुवात केल्याने चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्या हातावर काठीने मारले व कोयत्याचा धाक दाखवून सर्वांना दमदाटी केली व दागिने व पैसे कुठे ठेवले ते सांगा नाहीतर तुम्हा सर्वांना मारहाण करण्यात येईल
असे ते म्हणत घरातील सर्वांना एका खोलीत नेऊन बसवले. चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडत आत मध्ये असलेले १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १० तोळे चांदीचे दागिने चोरून नेले. चार चोर असून ते मराठीत बोलत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
चोरीच्या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. त्यांनी आजूबाजूला या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,
दीपक साबळे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली. सदर घटनेची फिर्याद नितीन राजेंद्र कोरडे यांनी आळेफाटा पोलिसांत दिली असून पुढील तपास पीएसआय अनिल पवार करत आहेत. बोरी परिसरामध्ये या घटनेमुळे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

