खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या समोर मांडली मनातील अस्वस्थता; खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार
1 min read
मुंबई दि.४:-सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीबाबत मनातील अस्वस्थता शरद पवार यांना भेटून मांडली. “अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप जनतेने 5 वर्षांसाठी दिलेल्या जबाबदारीचे 8-10 महिने अजून बाकी आहेत. या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली असून अनेक महत्वकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे सुद्धा तुझं कर्तव्य आहे.” असं मोलाचं मार्गदर्शन पवार यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना केले.
डॉ.अमोल कोल्हे यांनी पवार यांना दिलेल्या पत्रात म्हणाले की, आपण माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. जनतेचे, शेतकऱ्याचे, राज्याचे, देशाचे प्रश्न मांडण्याची संधी दिली.
तसेच मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही केले, त्याबद्दल मनापासून आभार! परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहीही करून सत्ता मिळवण्याचा अट्टाहास हे सर्व पाहून लोकशाहीतील तत्त्व, मूल्य, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, उत्तरदायित्व, नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
जर असं चित्र असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाच काय? आणि सुशिक्षित तरुणाईच्या मनात राजकारणाविषयी आणि एकूणच लोकशाही प्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचं पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येणाऱ्या घटना करतील याचे शल्य मनाला बोचत आहे.
साहेब, कलाकार म्हणून काम करताना मी सर्वाधिक भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या केल्या आहेत. 350 वर्षानंतर नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करूनही त्या स्वराज्याला माझं नाही तर रयतेच स्वराज्य’ म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श मनात ठेवून मी राजकारणात आलो परंतु स्वराज्याच्या उदात्त ध्येयासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे याच्याऐवजी सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय संस्कृती मनाला पटत नाही.
आणि नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर मी माझा खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे. म्हणूनच या सर्व निराशाजनक परिस्थितीत आपण आशेचा एकमेव किरण आहात. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती