राज्यातील हवामानात मोठे बदल; दि. १७ व १८ रोजी पावसाची शक्यता
1 min read
मुंबई दि.१३:- फेब्रुवारी महिन्याचे पहिले १०-११ दिवस कोरडे गेल्यानंतर आता वातावरणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्तर भारतात एकामागून एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे देशाच्या हवामानात मोठे बदल होत असून, याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. किमान तापमानात घट झाली असून गारठा वाढला आहे.
तसेच येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक ‘ट्रफ’ (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे.
यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.
सध्या उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे ‘बर्फीले’ आणि थंड आहेत.यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली असून रात्रीचा गारवा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि खान्देशात पारा काहीसा घसरल्याने पुन्हा एकदा थंडीची जाणीव होत आहे.
पुढील २४ ते ४८ तास ही स्थिती कायम राहील.१६ तारखे पासून महाराष्ट्राच्या आकाशात ढगांची गर्दी वाढण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
द्राक्ष, आंबा मोहर आणि रब्बीच्या पिकांवर ढगाळ हवामानामुळे कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. १७-१८ तारखेच्या संभाव्य पावसाचा अंदाज घेऊनच काढणीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
