“माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत”; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप
1 min read
जालना दि.१३:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय, त्यांची पोरं मोठी करायला लागलोय म्हणून मी वैरी झालोय. माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत’, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.‘आपल्याच जवळच्या लोकांना फोडून त्यांच्याकडून काहीही वदवून घ्यायला लागेलत’, असा आरोप पाटील यांनी केला.
शिवजयंतीला हजेरी
‘एखाद्या भंगार जातीला खूश करण्यासाठी खोटं बोलू नका, खरं बोला’, असा दमही मनोज जरांगे पाटील यांनी भरला. माचनूर,मंगळवेढा येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली होती.
यावेळी पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला.तसेच,सरकारने पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू न केल्यास आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिला.
व्यसनापासून दूर राहा
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. ‘मी हात जोडून तुम्हाला सांगतो, दारुचे व्यसन करु नका. व्यसनापासून लांब राहा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. दारु सोडा. शेतात काम करा’, असे आवाहन जरांगे पाटील.यांनी केले.
पंधरा दिवसच राजकारण करा
‘राजकारण करु नका अशा मताचा मी नाही पण, फक्त पंधरा दिवस राजकारण करा. त्यानंतर तुमच्या घराकडे लक्ष द्या. मुलाबाळांना अधिकारी करा. राजकारण पाच वर्षे आहे पण, घरातील पोरं अधिकारी झाल्यास पुढच्या पन्नास वर्षांची चिंता संपेल. कुठं सही करायची कुठं नाही आपल्या हातात असेल’, असे जरांगे पाटील म्हणाले.
अन्यथा आंदोलन
सरकारने पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. सातारा, मिरज आणि कोल्हापूर संस्थानाचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या बैठकांची सुरुवात सोलापूरातूनच करणार असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
