हवामानात मोठे बदल;राज्यात पहाटे गारवा तर दुपारी कडाक्याचे ऊन
1 min read
मुंबई दि.१२:- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि थंडी यांचा लपंडाव सुरू आहे. कधी दुपारी कडाक्याचे ऊन, तर कधी पहाटे गारवा, असं विचित्र हवापालट सुरू आहे.मात्र,आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळणार आहेत.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात एकामागून एक येणाऱ्या पॅसिफिक महासागराकडून येणारी वादळी वाऱ्यांमुळे हवामानाची दिशा सतत बदलत आहे. जरी या वादळांचा जोर डोंगराळ भागात जास्त असला, तरी त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत.
सध्या उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात १ ते २ अंशांची घट होऊ शकते. यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्रीचा गारवा पुन्हा एकदा जाणवेल.राज्यातील तापमानाचा विचार केला,
तर राजस्थान आणि गुजरातमध्ये पारा ३० अंशांच्या पार गेला आहे. त्याचे परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर (उदा. जळगाव, धुळे, नाशिक) दिसून येत आहेत.मात्र,आता वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे तापमानातील ही वाढ काहीशी थांबेल आणि हवामान अधिक ‘कंफर्टेबल’ होईल. १३ आणि १४ फेब्रुवारीच्या दरम्यान आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील,
त्यामुळे उन्हाचा चटका कायम असला तरी थंड वाऱ्यांमुळे तो फारसा जाचणार नाही.सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास येणारा नवीन ‘वेस्टर्न डिस्टरबेंस’. हा बदल केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित न राहता, मध्य भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे जमिनीकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रातील काही भागात, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या सीमेवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
मात्र, दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे तामिळनाडू आणि श्रीलंकेत मुसळधार पाऊस होणार आहे. याचा थेट परिणाम जरी महाराष्ट्रावर होणार नसला, तरी बाष्पाच्या हालचालींमुळे किनारपट्टीच्या भागात आर्द्रता वाढून काहीशी ‘दमट’ उष्णता जाणवू शकते.
