लाळ, खुरकत रोगाच्या निर्मुलनासाठी लसीकरण हाय प्रभावी उपाय; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
1 min read
पुणे दि.६:- लाळ खुरकत रोग हा गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो.
या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत व सांसर्गिक गर्भपात हे दोन रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
राज्यात १४ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–७ यशस्वीपणे पार पडली असून १५९ लक्ष गो व म्हैस वर्गीय पशुधनांपैकी १५३ लक्ष पशुधनांना लसीकरण करण्यात आले आहे. लाळ खुरकत रोगाचे संपूर्ण निर्मूलन होण्यासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.
त्यानुसार १३ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२६ या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–८ राबविण्यात येणार असून आवश्यक लस व साधनसामग्रीचा पुरवठा केंद्र शासना मार्फत करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था,
खाजगी पशुवैद्यक व पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहिम राबविण्यात येणार आहे.पशुंचे आरोग्य जपण्यासाठी, रोगप्रसार रोखण्यासाठी व पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून
आपल्या गो व म्हैस वर्गीय पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. आणि आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
