राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसांच्या विशेष शिबिराचा उत्साहात समारोप
1 min read
बेल्हे दि.२३:- राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसांच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप रानमळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, संविधानिक मूल्ये, नशामुक्ती व युवकांच्या सामाजिक सहभागाला चालना देणारे विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
शिबिराच्या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्योती दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल, आळेफाटा यांनी सायबर सुरक्षाबाबत जनजागृती केली. प्रा.संभाजी ढमाले यांनी पाणलोट विकास व पडीक जमीन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
मा. डॉ. मानिक बोहाडे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती केली. मा.डॉ.राहुल गोंगे यांनी भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी या विषयावर विचार मांडले. तसेच सचिन भोजणे यांनी सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याशिवाय मा. प्रा. मिनाक्षी सहाणे व मा. प्रा. सुलभा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिर अधिक समृद्ध झाले.
शिबिरादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात पाया खचलेल्या जागी विद्यार्थ्यांनी चार ट्रॉली मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली. तसेच भूमी कृषी सेवा केंद्राचे विशाल पाबळे यांच्या सहकार्याने माती परीक्षण व पाणी परीक्षण करण्यात आले.
गावातील रस्ते व ग्राम मदत कार्यालय परिसराची स्वच्छता, गाव सर्वेक्षण, तसेच नशामुक्ती जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढून पथनाट्य सादर करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने रानमळा येथे २५ फूट लांब व ७ फूट उंच, सुमारे ३०० गोण्यांचा वापर करून वनराई बंधारा उभारण्यात आला.
हा उपक्रम जलसंधारणासाठी उपयुक्त ठरत असून स्वयंसेवकांच्या श्रमदानाचे प्रतीक ठरला आहे.समारोप कार्यक्रमास अध्यक्ष संदीपान पवार,प्रा. डॉ. दिलीप कसबे (मराठी विभाग, कला वाणिज्य महाविद्यालय, चाकण), सागर कांबळे (संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश मंडळ), सविता तिकोने (विद्यमान सरपंच, रानमळा),
प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सुरेश तिकोने (माजी सरपंच रानमळा), यांच्यासह ग्रामस्थ, स्वयंसेवक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक अजय नन्नवरे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रवीण गोरडे यांनी केले.
समारोपप्रसंगी मान्यवरांनी NSS च्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, आजच्या काळात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे, आणि अशा उपक्रमांतून युवकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन व सामाजिक बांधिलकी निर्माण होते.
या सात दिवसांच्या विशेष शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव दृढ झाली असून, उत्साहपूर्ण वातावरणात शिबिराचा समारोप पार पडला.
