राज्यात भाजप-शिवसेनेचे वादळ; ठाकरे-पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त?पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेचे मानले आभार

1 min read

मुंबई दि.१७:- महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की,राज्याच्या शहरी मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘सुशासन’ आणि ‘विकासाच्या’ अजेंड्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि पुण्यापासून संभाजीनगर पर्यंत… भाजप-शिवसेनेने अक्षरशः मुसंडी मारली आहे. काही अपवाद वगळता,राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने एकतर्फी वर्चस्व मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. भाजप-शिवसेना यांच्या ‘महायुती’ने मुंबई, ठाण्यासह इतरही महत्त्वाच्या शहरांत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे, ‘मशाल’ आणि ‘तुतारी’ आणि काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी मोठे धक्के बसले आहेत. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईकडे होते. गेल्या अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावला आहे.227 जागांच्या मुंबई महापालिकेत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले, पण मुंबईकरांनी ‘मराठी कार्ड’पेक्षा ‘विकासाच्या’ मुद्द्याला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या जागा मिळवण्यात अपयश आलं आहे आणि मनसेला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. नंतर वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मात्र, काँग्रेस वंचितच्या आघाडीला या निवडणुकीत मोठ्या संख्येत जागा जिंकण्यात अपयश आले आहे.विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं, “महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे.महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे. महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे.

त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!