ऐनवेळी बदलला प्लॅन.. अन् बस अपघातातून चारही मित्र वाचले, ‘देव तारी त्याला कोण मारी’
1 min readबुलढाणा दि.२ :- लक्झरी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपूरहून पुण्याला निघालेला आयुष घाडगे हा तरुण काच फोडून बाहेर आल्याने तो भीषण अपघातातून वाचला. तो आणि त्याचे इतर तीन मित्र असे चौघे एकाच बसने पुण्याला जाणार होते.
परंतु ऐनवेळी प्लॅन बदलला आणि तिघे दुसऱ्या लक्झरी बसमध्ये बसल्यामुळे ते तिघे या अपघातातून बचावले. ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’ असे या तिघांच्या बाबतीत घडले, तर आयुष काच फोडून बाहेर आल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.
इतरांना वाचवू शकलो नाही याची खंत!
अपघातातून वाचलेला, भेदरलेला साईनाथ पवार (बोरवाडी, जि. नांदेड) याने सांगितले की, नागपूरहून संभाजीनगरला जाण्यासाठी या बसमध्ये बसलो होतो. कारंजा येथे जेवण केले आणि पुढच्या प्रवासाला बस निघाली. पण अचानक बस उलटली. आम्ही कसेबसे बाहेर निघालो. एका कॉन्स्टेबलने खिडकीची काच फोडायला मदत केली. पुढची काच फोडण्यासाठी आम्ही गेलो. पण तेवढ्यात जोराचा स्फोट झाला. मग मागे सरकलो. आम्ही वाचलो, पण इतरांना वाचू शकलो नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. हे सांगताना साईनाथचे अश्रू अनावर झाले.
निरगुडसर च्या शिक्षक, पत्नी आणि मुलीचा होरपळून मृत्यू
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निरगुडसर (ता. आंबेगाव) गावावर शोककळा पसरली आहे. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक कैलास गंगावणे (४८), पत्नी कांचन गंगावणे (३८), मुलगी सई ऊर्फ ऋतुजा गंगावणे (२०) या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगावणे कुटुंबीय मूळचे शिरूरचे राहणारे आहेत. नोकरीनिमित्त ते निरगुडसर येथे स्थायिक झाले होते.
शिक्षक कैलास गंगावणे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे असून गेल्या सत्तावीस वर्षांपासून ते निरगुडसर येथील नेहरू विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. कैलास गंगावणे यांचा मुलगा आदित्य याला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला नागपूरच्या महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला.