३१ डिसेंबरपर्यंत ग्रामस्थांनी आपली थकीत करपट्टी भरावी:- सरपंच किशोर घोडे

1 min read

बेल्हे दि.२६:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंचायतराज ग्रामसमृद्ध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.गाव थकीत करपट्टीमुक्त झाल्यास ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध विकास योजनांचा निधी मिळणे.शक्य होणार आहे. या उद्देशाने या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीमध्ये ५० टक्के सवलत देणेबाबत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून करपट्टी नियमित करण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला.गाव विकासामध्ये कर भरणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, ग्रामस्थांनी आपली करपट्टी वेळेत भरली, तर गावाला समृद्ध अभियानाचा पूर्ण लाभ मिळेल. ग्रामस्थांनी करपट्टी भरण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायती मार्फत ग्रामस्थांना करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर घोडे, ग्रामविकास अधिकारी बबन जोरवर, पोलिस पाटील अनिल टाकसाळे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी गाडगे, गणेश गाडगे, सुनंदा गाडगे, योगिता गाडगे व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

——-
प्रतिक्रिया

“गावाला थकीत करमुक्त करणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कर भरल्यास गावातील रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल. ३१ डिसेंबरपर्यंत ग्रामस्थांनी आपली थकीत करपट्टी नियमित करून
ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.”

– किशोर घोडे, सरपंच, निमगाव सावा
——–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!