खासगी बसवर सव्वा कोटीचा दरोडा,अवघ्या 12 तासांत दरोडेखोर जेरबंद

1 min read

कोल्हापूर दि.२६:- धारदार कोयत्याच्या धाकाने मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर दरोडा घालून 1 कोटी 22 लाख रुपये किमतीची 60 किलो चांदी आणि सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी पर्दाफाश केला.मुख्य सूत्रधार अक्षय बाबासाहेब कदम (32, रा. तिसरा बस थांबा, विक्रमनगर कोल्हापूर) याच्यासह 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीकडून लुटलेल्या चांदीसह दागिने हस्तगत करण्यात आले. पथकाने टोळीला टीप देणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वाहकाच्याही मुसक्या आवळल्या आहेत.पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाका ते वाठारदरम्यान सोमवारी रात्री उशिरा दरोड्याचा थरार घडला होता.स्थानिक गुन्हे अन्वेषणसह वडगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत दरोड्याचा छडा लावून टोळीला जेरबंद केले. मुख्य सूत्रधार अक्षय कदम याच्या विक्रमनगर येथील घरावर सकाळी छापा टाकून 60 किलो चांदीसह सोन्याचे दागिने व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!