जुन्नर तालुक्यात सर्वात मोठी आमटी-भाकरी यात्रा;लाखांच्या वर,भाकरी आमटीचा महासागर

1 min read

आणे दि.२२:- श्रीरंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा श्री क्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शनिवार दि.१३ ते रविवार २१ या कालावधीत संपन्न झाली. शनिवार दि.२० व रविवार दि.२१ रोजी भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी ८५ कढया आमटी बनवली व त्यासाठी २१ लाख २५ हजार रुपयांचा मसाल्याचा खर्च आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी दिली.देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या १३७ वर्षांपासून हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून आमटी-भाकरी केली जाते. येथील आमटी भाकरीची चव जगभरात प्रसिद्ध असुन लाखो भाविक स्वामींच्या दर्शनाला व महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात.आमटीही लोखंडी कढईत केल्यामुळे आमटीची वेगळी चव असते. आसपासच्या गावांमधून भाविकांसाठी हजारो किलो भाकरी येत असतात. आलेल्या भाकरीचे वाजत गाजत स्वागत केलं जातं. याचा लाभ दोन दिवसांत लाखो भाविक घेत असतात. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आमटी विद्युत पंपाच्या साह्याने नेली जाते.घरी महाप्रसाद नेण्यासाठी किटली मध्ये आमटीचे वितरण केलं जातं. वितरणासाठी काही कढया आमटी बनवली जाते.——–
तपोभूमीची परंपरा

वाराणसीहून येऊन रंगदास स्वामींनी अणे येथे तीन तपे साधना केली. पश्चिम वेशीजवळील मारुती मंदिरातील पिंपळाखाली साधना, पूर्व वेशीजवळील बारव्याशेजारी सुंदर बाग आणि अखेरीस पिंपळाखाली समाधी. हीच त्यांची तपोभूमी-कर्मभूमी. तेव्हापासून पुण्यतिथीचा यात्रोत्सव अव्याहत सुरू आहे. मुंबईकर झालेले जुन्नर तालुक्यातील भाविकही या यात्रेला आवर्जून येतात. लाखो भाविक, भव्य व्यवस्था वाढत्या गर्दीमुळे मांडवातील पंगती अपुऱ्या पडू लागल्यावर ग्रामस्थांनीलोकवर्गणीतून दोन कोटी रुपये खर्चुन १२ हजार चौरस फुटांचा दोन मजली हॉल उभारला. येथे पंगती बसतात. प्रसादासाठी ५ हजार पितळ्या असून एका पंगतीत ३ ते ४ हजार भाविकांना प्रसाद दिला जातो.———-
चौकट

एका कढईत पाचशे लिटर आमटी तयार केली जाते. आमटी तयार करताना एका लढाईसाठी पुढील मसाला वापरला जातो.खोबरे १० किलो, शेंगदाणे १० किलो, गुळ १० किलो, मिरची पावडर २ किलो, हळद पावडर अर्धा किलो, धना पावडर ५ किलो, आमसुल २ किलो, गरम मसाला ४ किलो, हिंग पावडर अर्धा किलो, जिरं अर्धा किलो, मोहरी अर्धा किलो, बेसन पीठ ५ कीलो, तूरडाळ २० किलो, तेल १५ लिटर, मिठ ६ किलो
——–
प्रतिक्रिया १

” दरवर्षीपेक्षा या वर्षी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. प्रत्येक वर्षी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे.आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुढच्या वर्षी ही असेच चोख नियोजन करू. यात्रेसाठी व महाप्रसाद बनवण्यासाठी देणगीदार मोठ्या प्रमाणात देणगी देतात. त्या सर्वांचे आभार.”

मधुकर दाते,
अध्यक्ष श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान————-
प्रतिक्रिया २

“भाविकांना दोन दिवस आमटी बनवली जाते.परिसरातील गावांतून लाखो भाकरी वाजत गाजत येतात. आमटी व भाकरी वाटपाच काम शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, आणे व परिसरातील नागरिक करतात. गावातील तरुण, ज्येष्ठ, महिला मंडळी सर्व हिरीरीने यात्रेत आलेल्या भाविकांची सेवा करतात.”

विजयकुमार आहेर,
विश्वस्त श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान
———-

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!