बिबट्यांचे हल्ले वाढल्याने संगमनेरमध्ये जन आक्रोश मोर्चा

1 min read

संगमनेर दि.१७:- संगमनेर तालुका बिबट्यामुक्त करा, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करा या मागणीसाठी सोमवारी संगमनेरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नागरिक रस्त्यावर उतरले असताना प्रशासनाची मात्र अनास्था समोर आली. प्रांताधिकार्‍यांनी निवेदन घेण्यास आचारसंहितेचे कारण दाखवत टाळाटाळ केल्याने‌ आंदोलक संताप्त झाले होते. अखेरीस त्यांनी नमते घेत आंदोलनकांसमोर येऊन निवेदन स्वीकारले.तालुक्यात गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. बिबट्यांची वाढलेली संख्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. यावर उपाययोजना व्हावी, यासाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होते.मोर्चा प्रशासकीय भवनासमोरील गेटवरच अडवण्यात आला. निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण देत टाळाटाळ केल्यामुळे आमदार तांबे आणि डॉ. जयश्री थोरात आक्रमक झाले. आमदार तांबे म्हणाले, बिबट्यांच्या दहशतमुक्तीविरोधातील हे आंदोलन राजकीय नाही, ज्यांचा मुलगा बिबट्याने उचलून नेला, ते कुटुंब व समाज न्यायासाठी एकत्र आला आहे. आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे. आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका, अन्यथा कार्यकर्ते कार्यालयात घुसतील! प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत असेल तर ते खपवून घेणार नाही.डॉ. थोरात यांनीही प्रशासनाची कानउघाडणी केली. त्यांनी राजकीय कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर एक आई म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले.त्या म्हणाल्या, ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे,हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. त्यांनी प्रशासनाला जनतेमध्ये येऊन महिला आणि नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचे आवाहन केले. आचार संहितेच्या नावाखाली लपून न बसता प्रांताधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. अखेरीस, प्रांताधिकारी अरूण उंडे यांनी आंदोलकांना सामोरे जात निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, वनविभागाचे अधिकारी केदार आदी उपस्थित होते.‌ संपूर्ण संगमनेर तालुका बिबट्यांचा वावर व त्याचे होणारे वाढते हल्ले यामुळे दहशतीखाली आला आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणेही अवघड झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!