अपंग महिलेचा महिलांच्याच टोळीने केला खून; दोघी अटक
1 min read
अहिल्यानगर दि.१७:- घरात एकट्याच असलेल्या अपंग महिलेच्या खुनाचा उलगडा अखेर अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. महिलांच्याच टोळीने चोरीच्या उद्देशाने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दोन महिलांना अटक करण्यात आली आहे तर दोन मुली विधी संघर्षग्रस्त आहेत.
यापूर्वी पोलीस तपासात पुरुषांच्या टोळीने खून केल्याच्या घटना सर्रासपणे आढळल्या. मात्र शहरातील उपनगरात अपंग महिलेच्या खुनामागे महिलांचीच टोळी असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे
(वय २०, रा. भारत बेकरीच्या पाठीमागे बालाजीनगर बोल्हेगाव, अहिल्यानगर) व तिची साथीदार अंजुम उर्फ मेहक अहमद सैफची (वय २२ मोरया पार्क, बोल्हेगाव, अहिल्यानगर मूळ रा. करवाल नगर, दिल्ली असे अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत तर एक अहमदाबाद मधील व दुसरी छत्रपती संभाजीनगरमधील अशा दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.
बोल्हेगाव उपनगरात भरदिवसा, भरदुपारी एका अपंग महिलेचा धारदार शस्त्राने वार करून निघृणपणे खून करण्यात आल्याची दि. १२ डिसेंबरला घडली. घटनेच्या दिवशी महिलेचा पती व मुलगा नाशिक जिल्ह्यात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.या महिलेच्या घराशेजारीच दिव्या अंकुश देशमुख हिचे माहेर आहे.
त्यामुळे या महिलेची तिचा परिचय होता. महिला अपंग असल्याने लूटमार करण्याच्या उद्देशाने तिने तिच्या इतर सहकारींना एकत्र केले. या चौघी एमआयडीसीमधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होत्या मात्र इतर वेळी एका केटरिंगच्या व्यवसायीकाकडे एकत्र काम करत असल्याने त्यांचा परिचय झाला होता.
दिव्या देशमुख हिला महिला घरी एकटीच असते तसेच तिच्याकडील दागिन्यांची माहिती होते. त्यातूनच तिने चोरीची कल्पना इतर तिघांना दिली. त्यासाठी मिरचीची पूड घेऊन चौघी गेल्या. दिव्या देशमुख ही घराबाहेर पहारा करत थांबली. इतर तिघी आत गेल्या. अपंग महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र त्यांनी ओढले,
महिला प्रतिकार करू लागल्याने तिघींनी घरातच पडलेले चाकू व ब्लेडपानने अपंग महिलेच्या हनुवटी व गळ्यावर वार केले. नंतर त्या तेथून दागिने घेऊन निघून गेल्या.गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक मेढे, राजेंद्र वाघ, अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अतुल लोटके, दीपक घाटकर, अमृत आढाव, सतीश भवर, प्रशांत राठोड, महिला पोलीस भाग्यश्री थिटे,
ज्योती शिंदे, छाया माळी, सोनल भागवत यांच्या पथकाने परिसराची पाहणी करत आरोपींची माहिती काढली व महिलांना अटक केली.अपंग महिलेकडील दागिने पळवल्या नंतर ते या चौघींनी एका पतसंस्थेत गहाण ठेवत व त्याच्यावर कर्जाऊ पैसे मिळवले. याचाही तपास पोलीस करत आहेत.
