महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीच्या खमंग दरवळ ने दिल्लीकरांना केले मोहित
1 min read
नवी दिल्ली दि.१७:-देशाच्या राजधानीत गेले तीन दिवस आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025 च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीचा खमंग दरवळ दिल्लीकरांना मोहित करुन गेला. केवळ खाद्यपदार्थांच्या सादरीकरणापुरता हा महोत्सव मर्यादित राहिला नाही, त्यासोबतच संस्कृतीच्या विविध आविष्कारांचे दर्शन झाले.
आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला राष्ट्रीय स्तरावरही व्यासपीठ मिळाले. दिल्लीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवाचा नुकताच समारोप झाला.कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या उत्सवाचे खरे वैभव ठरले ते महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ‘उमेद’ योजनेअंतर्गत कार्यरत महिला स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग. अमरावती, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड आणि नागपूर येथील प्रशिक्षित महिलांनी आपले घरगुती आणि पारंपरिक पदार्थ राष्ट्रीय स्तरावर सादर करून ओळख मिळवली.
यावेळी, महिलांनी निवासी आयुक्त आर. विमला यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ‘यामुळे आमच्या ग्रामीण स्वप्नांना पंख मिळाले’ अशी भावना व्यक्त केली.समारोप समारंभात मार्गदर्शन करताना निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी आणि ‘उमेद’च्या महिलांचे कौतुक केले. यावेळी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोळपते, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
