वळसे पाटील महाविद्यालयात नोकरीच्या सुवर्णसंधी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
1 min read
निमगाव सावा दि.२९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभाग आणि स्किल इंडिया आय.आय.बी.एम. चिंचवड,
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरीच्या सुवर्णसंधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संस्था प्रतिनिधी सौ. कविता संदिपान पवार या होत्या. संस्थेचे अध्यक्ष संदिपान पांडुरंग पवार, स्किल इंडिया च्या समुपदेशक सुजाता साळुंके
व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांनी यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हे एक युगपुरुष होऊन गेले. पुरोगामी महाराष्ट्राची खरी मुहूर्तमेढ फुले,शाहू,आंबेडकरांनी घातली.
समाजातील अनिष्ठ चालीरीती, रूढी-परंपरा, व अज्ञान दूर करण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय समाजजागृतीचे शिल्पकार होते. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, शोषितांच्या मुक्तीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहे.
महात्मा ज्योतिराव फुले हे समाजसुधारक, विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक होते. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि जातीय शोषणाविरोधातील ज्वलंत भूमिका हा होता. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, जातिभेदाचे मूलतत्त्व, इशारा आणि तृतीय रत्न यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी अन्यायग्रस्त,
शोषित आणि बहुजन समाजाच्या वेदना शब्दबद्ध केल्या. असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून स्किल इंडियाचे समुपदेशक सुजाता साळुंके, सोनाली जाधव व अलका लिमजे यांनी विद्यार्थ्यांना खाजगीकरण,
उदारीकरण व जागतिकीकरणाच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मसात करावयाच्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील निवड झालेल्या 60 विद्यार्थ्यांना स्किल इंडियाच्या अंतर्गत तात्काळ जॉब ऑफर लेटर देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अशा या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी कौतुक केले व निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ज्योती गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ यांनी केले.
तर आभार वाणिज्य विभागातील प्रा. योगेश भालेराव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
