मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळा सोबत बैठक
1 min read
मुंबई दि.९:- राज्य शासन ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.
शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाच्या भेटी दरम्यान हॉटेल ताज पॅलेस येथे केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.ज्याप्रमाणे लंडन म्हणजे युकेची ओळख आहे, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो.राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले.
यावेळी ब्रिटिश शिष्टमंडळातील सदस्यांनीही महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या उद्योगक्षेत्राबद्दल समाधान व्यक्त करुन एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करून राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचेही उपस्थित सदस्यांनी सांगितले.
