आजचा दिवस मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल:- अजित पवार

1 min read

मुंबई दि.८:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. यानिमित्तानं उपस्थितांसमोर विकसित महाराष्ट्राला घेऊन असलेल्या पवार यांनी भावना व्यक्त केल्या.या वेळी पवार बोलताना म्हणाले की, आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं तसंच मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या राज्य सरकारच्या कार्यक्षमतेमुळे तसंच मोदी साहेब आणि एकूणच केंद्र सरकारच्या ठाम पाठबळामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. मी मोदी साहेब यांच्यासह सर्वांचे मनापासून आभार मानतो. कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा भुयारी मेट्रो मार्ग सुरु झाल्यानं शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही, तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान, सोयीस्कर, सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे. कफ परेड, गिरगाव, काळबादेवी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवा जोडली गेली आहे. प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.त्याचप्रमाणे एमएमआरडीएनं साकारलेलं ‘मुंबई वन’ हे ॲप म्हणजे वन मुंबई – वन ॲप या संकल्पनेची झलक दाखवतो. या ॲपच्या मदतीनं आपल्याला लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, बस इ. सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार आहे. हा ॲप मुंबईला आणखी युनायटेड, कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवेल. त्याचबरोबर आज सुरु होत असलेलं ‘अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हे युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे दमदार पाऊल आहे. शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम उपयुक्त व्हावं, हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे.आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशानं विकासाची नवी झेप घेतली आहे.’विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे आपण वेगानं वाटचाल करतोय. या प्रवासात आपला महाराष्ट्र अग्रस्थानी राहील, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत समन्वयानं, वेगानं काम करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरु झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करताहेत, ही आपली मोठी ताकद आहे. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आपल्याला अजून विकासाचे अनेक टप्पे गाठायचे आहेत. यंदाच्या अतिवृष्टीनं उद्भवलेल्या पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. मात्र राज्य सरकारच्या वतीनं शेतकरी बांधवांना तातडीनं मदत पोहोचवण्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम सुरु आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील चर्चा झाली असून केंद्र सरकार मदतीचा हात देईल, असा मला ठाम विश्वास आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!