चढ्या दराने बियाणे व किटकनाशके विक्री करणाऱ्या सहा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
1 min read
नगर दि.१५:- ठरवून दिलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करणे कृषी सेवा केंद्र चालकांना चांगलेच भोवले आहे. कृषी विभागामार्फत चार बियाणे विक्री केंद्राचे व दाेन किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन करु नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
खरीप हंगाम सुरू झालेला आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीसाठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.