अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी; २७ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत;मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई दि.१४ : गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.१३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या ५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत.
त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२,५०० रुपये प्रति हेक्टर अशी २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.