समर्थ मध्ये विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं प्रशिक्षण;१४ विद्यार्थी जर्मन भाषा-१ या प्रमाणपत्राने सन्मानित
1 min readबेल्हे दि.१३:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत फॉरेन लाग्वेज क्लब अंतर्गत “जर्मन लँग्वेज ए वन लेवल सर्टिफिकेशन प्रोग्रॅम ” पूर्ण करण्यात आला.
उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार च्या वतीने तयार करण्यात आलेल्या एन पी टी ई एल या ऑनलाइन सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या “जर्मन लँग्वेज ए वन लेव्हल सर्टिफिकेशन प्रोग्रॅम” या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील १४ विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केल्याची माहिती प्रभारी प्राचार्य प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली.
त्यापैकी अश्विनी देशमुख व रुचिता जगताप या विद्यार्थ्यांनी एलाईट या कॅटेगरीमध्ये विशेष प्राविण्य संपादन करून यश मिळवले.त्याचप्रमाणे समर्थ बीबीए महाविद्यालयात द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रथम व द्वितीय सत्रा मध्ये जर्मन विषय हा अभ्यासक्रम असल्याने त्यांना देखील या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाल्याचे बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार व समन्वयक डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रगत तंत्रज्ञान आणि परदेशी भाषा या दोन्हींचा समन्वय साधून जर्मन भाषा अवगत होण्यासाठी “विशेष प्रशिक्षण कार्यक्रम” नुकताच पूर्ण करण्यात आला.सदर प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शुभम शिरवळकर या माजी विद्यार्थ्यांने द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागामध्ये शिकत असलेल्या १६ विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या अंतर्गत ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले.
फॉरेन लँग्वेज क्लब च्या साहाय्याने संकुलातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परदेशी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.जर्मन ही युरोपमध्ये सर्वाधिक प्रमाणात बोलली जाणारी मूळ भाषा आहे.
भारतामध्ये जर्मन भाषेचे करिअर व्यापक स्वरूपात आहे. जर्मन भाषा कौशल्य अवगत केल्याने जर्मनीमध्ये उच्च शिक्षणाच्या तसेच इंजिनिअरोंग च्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे जर्मन विषय तज्ज्ञ शुभम शिरवळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी च्या प्रा.दिपाली गडगे, प्रा.पूनम भोर यांनी तर बी बी ए च्या प्रा.गणेश बोरचटे यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.