बेल्हे बाजाराची वाट बिकट; व्यापारी व ग्राहकांना मनस्ताप

1 min read

बेल्हे दि.२४:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे भाजी बाजारात सर्वत्र चिखल होत असून बाजारातील सर्व रस्त्यांची वाट बिकट होत आहे. भाजी बाजारात रस्त्यांवर पावसाने तळे साचत असून सर्वत्र चिखल होत आहे. भाजी खरेदी करण्यासाठी अगोदर चिखल तुडविण्याची शिक्षा ग्राहकांना मिळत आहे. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. कारण चिखलामुळे ग्राहक भाजीपाला व फळेखरेदी कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.सोमवारच्या आठवडे बाजारातील सर्वच भागांतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आधी चिखल तुडवावा लागतो. काही ठिकाणी रस्त्यांवर चिखलपाण्याचे तळे साचले आहे. त्यातून ये-जा करताना कसरत करावी लागते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे या बेल्हे उपबाजार आवाराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष असून गेली वीस वर्ष आम्ही या चिखलातच बसून व्यापार करत आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने व्यापारी व विक्रेत्यांसोबतच ग्राहकांनीही संताप व्यक्त केला. तालुक्याच्या बऱ्याच बाजारातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून, बेल्हे भाजीपाला बाजारचा रस्ता काँक्रीटचा का होत नाही असाही संतप्त सवाल काही व्यापाऱ्यांनी विचारला असून बाजारातील रस्ते काँक्रिटचेच करावेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!