बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे २५ कोटी ३७ लाख रुपये कर्ज वाटप; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर

1 min read

बेल्हे दि.२५:- येथील १०८ वर्षे जुन्या असलेल्या बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ यांनी अहवाल वाचन केले, तसेच विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. व संचालक मंडळानेही सभासदांच्या सर्व प्रश्नांना योग्य व समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.सचिव गुंजाळ यांनी संस्थेचा आलेख हा नेहमीच उंचावत असून जून २०२५ अखेर बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे एकूण सभासद ३ हजार ५०१ असून संस्थेने २५ कोटी ३७ लाख ३४ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ८१ लाख ५० हजार २३७ आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक ३ कोटी ८२ लाख २१ हजार ५३५ रुपयांची आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेला ३७ लाख ५७ हजार २१९ रुपये एवढा नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश संचालक मंडळाने जाहीर केला आहे.संस्थेला सन २०२४/२५ या आर्थिक वर्षाच्या वैधनिक लेखापरीक्षण अहवालात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. संस्थेची बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाली असून संस्था पातळीवर ८९ टक्के वसुली झाली आहे.उर्वरित कर्जदार सभासदांनी आपले कर्ज वेळेत भरून संस्थेला सहकार्य करावे व शासनाने दिलेल्या व्याज परताव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.तसेच केंद्र सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक गोदाम योजने अंतर्गत संस्था गोदाम बांधत असून त्यासाठी ३३% सबसिडी, ४% व्याज व ३% व्याज परतावा मिळणार आहे.सोसायटीला खते, बी बियाणे विक्री व्यवसाय चालू करण्यासाठी परवाना मिळाला असून तो व्यवसाय चालू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे असे अध्यक्ष गुंजाळ यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मारुती गुंजाळ, अशोक घोडके, भाऊसाहेब भांबेरे, विश्वनाथ डावखर, विठ्ठल गुंजाळ, बबन गुंजाळ, प्रदीप पिंगट, सुरेश बोरचटे, सावकार पिंगट, गोरक्षनाथ वाघ, सुभाष गुंजाळ या इतरही अनेक सभासदांनी भाग घेतला. यावेळी संस्थेचे ३५०१ सभासद असताना वार्षिक सभेला फक्त १७५ सभासद वार्षिक सभेला उपस्थित होते, सभासदांनी वार्षिक सभेकडे पाठ का फिरविली ? याचाही संचालक मंडळाने विचार करणे गरजेचे आहे. तसेच यावेळी इ सेवा केंद्राबाबत व्यवस्थित सेवा मिळत नसल्याची तक्रार काही सभासदांनी केली. यावेळी संस्था इ सेवा देण्यासाठी आग्रही असून, संस्था या साठी एक जागा भरून इ सेवा देणार आहे, असे उत्तर मिळाले.बेल्हे गावातील खते व औषधाचे दुकानदार नेहमी लागणारी खते खरेदी करण्यास गेल्यास खतांची किंमत जास्त सांगितली जाते आणि त्यासोबत अनावश्यक औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबण्यासाठी आपल्या सोसायटीने स्वतःचे खरेदी विक्रीचे दुकान चालू करावे अशी मागणी बहुतांश सभासदांनी केली आणिविशेष म्हणजे या वार्षिक सभेला सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व सभासदांचे आभार मोहन बांगर यांनी मानले.यावेळी बँकेचे विकास अधिकारी सिद्धेश गुजर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!