पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा; शासन निर्णय जारी

1 min read

मुंबई दि.१३:- महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे. विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे.राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन 15 हजार पदांची पोलीस भरती करण्यात येत आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. दरम्यान, गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नुसार सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे, 2022 ते 2025 या 4 वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!