शिवनेरी एक्सप्रेस इम्पॅक्ट! जांबुत फाटा ते बेल्हे दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेल्हेकर कंपनीला सूचना
1 min read
Oplus_16908288
बेल्हे दि.१३:- जांबुत फाटा ते बेल्हे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम २०२३ मध्ये डी.जी बेल्हेकर अँड कंपनीने पूर्ण केले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दोन अडीच वर्षात अनेक खड्डे पडले आहेत.
या बाबतची बातमी शिवनेरी एक्सप्रेस ने दिनांक ३ सप्टेंबर रोजी ‘बेल्हे – जांबुत फाटा रस्त्याचे काम निकृष्ट; दोन वर्षात रस्त्याची दुरावस्था’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. तसेच स्थानिकांनी ही रस्ता दुरुस्ती करण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.
या सर्वांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने बेल्हेकर अँड कंपनीला पत्र देऊन दुरुस्तीची करण्याची लेखी सूचना दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सूचना पत्रात म्हटले आहे की, सदर रस्त्याचे काम आपण २०२३ पूर्ण केलेले आहे. सद्यस्थितीत पावसाळ्यात सदरील कामावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. सदरील कामाचा निविदा अटी व शर्तीमधील अट क्रमांक २० नुसार रुंदीकरणाच्या कामासाठी ६० महिने व अस्तित्वातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी ३६ महिने इतका दोषदायित्व कालावधी आहे.
तरी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत भरुन घेण्यात यावे व वाहतुक सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी. सदरील खड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल.