सुशीला कार्की नेपाळच्या नव्या अंतरिम पंतप्रधान
1 min read
काठमांडू दि.१३:- नेपाळच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून काल शपथ घेतली आहे.नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळ बैठक पार पडली. त्यानंतर सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान, सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी सध्या तरी त्यांच्या अंतरिम मंत्रिमंडळात कोणत्याही मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. सुशीला कार्की यांची मनधरणी नेपाळचं प्रमुखपद स्वीकारण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात
आल्यानंतर सुशीला कार्कींच्या नावाची चर्चा समोर आली होती. मात्र, या पदासाठी सुशीला कार्की यांनी आधी नकार दिला होता. दरम्यान, त्यानंतर सुशीला कार्की यांची लष्कर प्रमुख सिगदेल धपासी यांनी त्यांची मनधरणी करण्यात आली. आंदोलकांकडून कार्कींना अधिकृत विनंती अर्जही देण्यात आला होता.
पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नव्हता. मात्र, त्यानंतर जनरल सिगदेल यांनी कार्कींची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली.सध्या देशात असणाऱ्या प्रमुख नेतेमंडळींपैकी कार्की या एकमेव व्यक्ती या क्षणी नेपाळच्या प्रमुख होऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं.
याशिवाय, आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या बालेंद्र शाह यांचं नाव आंदोलकांकडून प्रमुखपदासाठी प्रस्तावित केलं जात होतं, त्यांनी देखील कार्की यांच्याच नावाला समर्थन असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर सिगदेल यांच्या प्रयत्नांना यश आलं असून कार्की यांनी देशाचं अंतरिम प्रमुखपद स्वीकारलं.
कोण आहेत सुशीला कार्की?
सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. आठ वर्षांपूर्वी म्हणजेच जून २०१७ साली त्या सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्या. पण त्यावेळची परिस्थिती त्यांच्यासाठी आनंददायी अशी नव्हती. नेपाळ काँग्रेसनं संसदेत त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, कार्की निवृत्त झाल्यानंतर हा प्रस्ताव बारगळला. यावेळी मात्र नेपाळचं लष्कर त्यांच्या बाजूने उभं असणार आहे. नेपाळमध्ये नव्या राज्यघटनेची मांडणी करण्याचं मोठं काम त्यांना निभावून न्यावं लागणार आहे.पुढील सहा महिन्यांत संसदेच्या नवीन निवडणुका होणार?
दरम्यान, सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात सध्या तरी कोणालाही मंत्री बनवण्यात आलेलं नाही. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत संसदेच्या नवीन निवडणुका होणार असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आहे.