दणक्यात वाढदिवस साजरा करणं माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना भोवल; चार दिवसांची पोलीस कोठडी
1 min read
जुन्नर, दि.१३:- जुन्नर येथे वाढदिवसाच्या मिरवणुकीदरम्यान डीजे-गाडीच्या धडकेमुळे एका युवकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या घटनेतील मुख्य आरोपी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम
लांडे यांना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अपघातात आदित्य काळे या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन झाले होते.यानंतर पोलिसांनी देवराम लांडेसह अन्य आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
लांडे यांच्यासह डीजे चालक नामदेव रोकडे हेही पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील इतर दोन फरार आरोपी, अमोल लांडे आणि सौरभ शेखरे, यांचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी दिली.
मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी नसतानाही, डीजेवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जर वेळीच डीजे जप्त केला असता, तर एका निष्पाप तरुणाचा जीव वाचला असता,
असे वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ यांनी म्हटले आहे.तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी नुकतीच या कुटुंबांची भेट घेऊन एक लाख रुपये देऊन कुटुंबियांना मदत केली. मृत तरुण गरीब कुटुंबातील असून सढळ हाताने देणगी देण्याचे आवाहन अजिंक्य घोलप यांनी जनतेला केले आहे.