पुणे जिल्ह्यातील १०३४ ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र
1 min read
पुणे दि.१३:- राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण १०६२ सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीमधील नागरिकांना मिळणार आहेत. त्यासाठी आत्तापर्यंत जिल्ह्यातील १०३४ ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे.पुणे जिल्ह्यातील १०८७ ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत १०१४ ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत.
संबंधित आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.
त्यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय २८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत केले आहे.याबाबत आयोजित कार्यशाळेमध्ये करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच, तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. पर्यायाने, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.