लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले
1 min read
मुंबई दि.७:- लाखो मुंबईकरांचे श्रद्घास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनला यंदा खूप उशीर झाला आहे. लालबागचा राजाची मिरवणूक शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. यानंतर संपूर्ण रात्रभर लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. यानंतर सकाळी ८ च्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता. मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्याने विसर्जनास अडथळे निर्माण झाले आहेत.
आता याप्रकरणी लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा लालबागचा राजाचे विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफ तयार करण्यात आला होता.मात्र, लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर चढत नसल्यामुळे गेल्या साडेतीन तासांपासून हा गणपती समुद्रात चार ते पाच फूट पाण्यात बसून आहे.
यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेशभक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटले आहे. किनाऱ्यावर असलेले अनेक भक्त लालबागचा राजाची विनवणी करत आहेत. आमच्याकडून काही चुकलं-माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही, अशी याचना भक्तांकडून केली जात आहे.
लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता मंडपातून निघाला होता.तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली.
त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन रखडले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. मात्र, यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे. समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत आहे.
त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही लालबागचा राजा तराफ्यावर चढलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन तासांपासून लालबागचा राजा समुद्रात बसून आहे.
समुद्राला भरती असल्यामुळे लालबागचा राजाचा मूर्तीचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे. अशाच अवस्थेत मूर्ती पाण्यात बसून असल्यामुळे गणेशभक्तांच्या मनात कालवाकालव सुरु आहे. यापूर्वी लालबागचा राजाचा पाट जड होण्याचा प्रकार कधीही घडला नव्हता. आता कोळी बांधव आणि लालबागचा राजाचे कार्यकर्ते गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.