१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा’
1 min read
मुंबई दि.६:- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजीचा ७५ वा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा, या अनुषंगाने राज्यातील सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. १ ऑक्टोबर रोजी राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.
प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नसलेल्या होतकरू युवक, युवतींना प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.
या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे.