पुण्यात टोळी युद्धाचा भडका? पुण्यात रक्तरंजित थरार
1 min read
पुणे दि.६:- पुण्यातील नाना पेठेत परिसरात गँगवॉरची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती.
त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रविवारी तयारी करण्यात आली होती. पण पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी वॉच ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळत अटक केली होती. पण त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
पोलीस त्याचा शोध घेत होते. या दरम्यान, आज हत्येची घटना घडली. पोलिसांकडून उद्याच्या गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. असं असताना नाना पेठेत अचानक हत्येची घटना घडली. आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणं हे पुणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्याने कट उधळला गेला.
या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर गट व सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेलं आहे. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला;
तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती. त्यातुन बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा 2024 च्या 1 सप्टेंबर रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या हत्येने पुण्यात खळबळ उडाली होती. वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “गेम” उडणार अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू होती.